*कोणी रोड देत का रोड…?” सलाबतपूर–दिघी मार्गाची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल*
*कोणी रोड देत का रोड…?” सलाबतपूर–दिघी मार्गाची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल*
नेवासा प्रतिनिधी :- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
“रोडमध्ये खड्डे की खड्ड्यांमध्ये रोड?” असा प्रश्न आज सलाबतपूर–दिघी मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पडत आहे. अनेक वर्षांपासून विकासकामांच्या प्रतीक्षेत असलेला हा महत्त्वाचा मार्ग आज अक्षरशः चिखलमय घसरगुंडी बनला असून, संतप्त नागरिकांनी या रस्त्याचे “घसरगुंडी रोड” असे नामकरण करण्याची उपरोधिक मागणी केली आहे.
सलाबतपूर–दिघी हा मार्ग केवळ गावांना जोडणारा रस्ता नसून शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील नागरिकांसाठी प्रवरासंगम, टोका, कायगाव यांसारख्या तीर्थक्षेत्रांकडे जाण्याचा महत्त्वाचा दुवा आहे. दररोज शेकडो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र आज या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्यावर खडी किंवा दगडाचा मागमूसही दिसत नसून सर्वत्र चिखल आणि मातीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात तर हा मार्ग पूर्णतः धोकादायक बनतो. विशेषतः दिघी परिसर व सलाबतपूर वस्तीतील शेकडो विद्यार्थी दररोज सायकल किंवा पायी शाळेसाठी ये-जा करतात. रस्त्यावरील खड्डे, चिखल आणि घसरडी परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी सायकलसह घसरून पडल्याच्या घटना घडल्या असून काहींना दुखापतीही झाल्या आहेत. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षच होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने होत आहे. अनेक पंचवार्षिक निवडणुका आल्या-गेल्या, अनेक आश्वासने दिली गेली, निवेदने सादर करण्यात आली; मात्र प्रत्यक्षात रस्त्याच्या कामासाठी कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“आमचा उपयोग फक्त मतदानापुरताच केला जातो का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. निवडणुकीच्या काळात विकासाची आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर या भागाकडे पाठ फिरवतात, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारी करणारे कामगार यांना या रस्त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांची मोडतोड, अपघात आणि वेळेचा अपव्यय नित्याचाच झाला आहे. तरीही संबंधित विभाग आणि प्रशासन याकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नसल्याचा आरोप होत आहे.
आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की नागरिकांना “कोणी रोड देत का रोड…?” अशी हाक मारण्याची वेळ आली आहे. हा रस्ता लवकर होणार की पुढील पिढ्यांनाही याच समस्यांचा सामना करावा लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परिसरातील नागरिकांनी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना तातडीने लक्ष घालून सलाबतपूर–दिघी मार्गाचे दर्जेदार डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांकडून दिला जात आहे. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आणि या रस्त्याच्या कामाला तात्काळ मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.




