*वाढदिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गोड जेवण आणि शाळा विकासासाठी उदार मदतीचा हात*
कावीळ तज्ञ सुनील वाबळे यांचा सेवाभावी उपक्रम..

*वाढदिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गोड जेवण आणि शाळा विकासासाठी उदार मदतीचा हात*
कावीळ तज्ञ सुनील वाबळे यांचा सेवाभावी उपक्रम..
नेवासा (प्रतिनिधी):– महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा आदर्श उपक्रम अंतरवाली येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. सुनील आप्पा वाबळे आणि श्री. प्रशांत वाबळे यांनी राबविला.
वाढदिवसानिमित्त श्री. सुनील आप्पा वाबळे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन दिले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देत आनंददायी वातावरण निर्माण केले. याचबरोबर शाळेत सुरू असलेल्या शौचालय व स्टेज बांधकामासाठी ₹२,१०० ची रोख मदत देऊन शाळा विकासातही मोलाचे योगदान दिले.

विशेष म्हणजे, शाळेतील उर्वरित विकासकामांनाही त्यांनी पाठिंबा दर्शवत एका वर्गाची फरशी स्वतःच्या खर्चाने बसवून देण्याची घोषणा केली. त्यांच्या या उदार निर्णयाचे शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
याचवेळी, सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले अंतरवाली गावचे सुपुत्र श्री. प्रशांत वाबळे यांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या भौतिक सुविधांसाठी ₹५,००१ ची देणगी पाठवून गावाशी असलेली आपुलकी जपली.
या समाजाभिमुख उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी श्री. सुनील आप्पा वाबळे आणि श्री. प्रशांत वाबळे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
दरम्यान, शाळेतील उर्वरित वर्गांच्या फरशीचे काम पूर्ण करण्यासाठी लोकसहभागातून स्वेच्छेने आर्थिक मदत करण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व दानशूर व्यक्तींना केले आहे. समाजाच्या सहकार्याने शाळेचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




