*लोकनेते मारुतरावं घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याच्या चेअरमनपदी पुन्हा डॉ. नरेंद्र पाटील घुले; व्हाईस चेअरमनपदी सुधाकर नरवडे यांची बिनविरोध निवड*
*लोकनेते मारुतरावं घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याच्या चेअरमनपदी पुन्हा डॉ. नरेंद्र पाटील घुले; व्हाईस चेअरमनपदी सुधाकर नरवडे यांची बिनविरोध निवड*
नेवासा | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी आमदार डॉ. नरेंद्र पाटील घुले यांची, तर व्हाईस चेअरमनपदी सुधाकर नरवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तर नेवासा येथील सहाय्यक निबंधक देवीदास घोडेचोर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. यावेळी कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, संचालक मंडळाचे सदस्य, सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीपूर्वी चेअरमनपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले तसेच ॲड. हिम्मतसिंह देशमुख यांच्या नावांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. मात्र, अखेर सर्वसंमतीने दोन्ही पदांची बिनविरोध निवड झाल्याने सहकार क्षेत्रात या निर्णयाची विशेष दखल घेतली जात आहे.
नवनियुक्त चेअरमन डॉ. नरेंद्र पाटील घुले यांनी मनोगतात सांगितले की, स्व. मारुतराव घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेल्या या कारखान्याच्या उभारणीत स्व. भाऊसाहेब देशमुख, स्व. वकील अण्णा लंघे, माजी व्हाईस चेअरमन पांडुरंग अभंग, देसाई आबा देशमुख तसेच भेंडा-कुकाणा परिसरातील ज्येष्ठ सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे कारखान्याने प्रगतीची वाटचाल केली. आता ही परंपरा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याची जबाबदारी आमच्यावर असून सभासदांचा विश्वास कायम राखण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी सर्व सभासद व संचालकांचे आभार मानत सांगितले की, सर्वांनी मनाचा मोठेपणा दाखवत उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केले. कारखान्याच्या हिताला प्राधान्य देण्याची ही परंपरा भविष्यातही कायम ठेवण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले.
माजी व्हाईस चेअरमन पांडुरंग अभंग यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ज्ञानेश्वर कारखान्याची बिनविरोध निवड ही महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी वेगळी ओळख निर्माण करणारी घटना आहे. कारखान्याचा काटकसरीचा, पारदर्शक आणि सक्षम कारभार डॉ. नरेंद्र घुले यांनी यशस्वीपणे सांभाळला असून नवीन पदाधिकाऱ्यांनीही ही परंपरा अधिक बळकट करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अनुभवी व्हाईस चेअरमन सुधाकर नरवडे यांच्या नेतृत्वाचा कारखान्याला निश्चितच लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याचवेळी पांडुरंग अभंग यांनी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून कारखान्याच्या हिताला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. कोणताही आकस न ठेवता सहकार्याची भूमिका घेतल्यामुळे बिनविरोध निवडीचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक दिवस निवडणूक होणार अशी चर्चा असतानाही अखेर सर्वसंमतीने निवड झाल्याने सर्व राजकीय अंदाज फोल ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
नवनियुक्त व्हाईस चेअरमन सुधाकर नरवडे यांनी मनोगतात सांगितले की, स्व. मारुतराव घुले पाटील यांच्या त्याग, दूरदृष्टी आणि सहकार तत्त्वज्ञानातून उभा राहिलेला हा कारखाना सभासदांचा विश्वास जपणारा आहे. संचालक मंडळाच्या कारभारामुळे कोणालाही मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही काम होणार नाही. माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा ऋणी असून पारदर्शक, प्रामाणिक आणि जबाबदारीने काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, ज्ञानेश्वर कारखान्याच्या चेअरमनपदी पुन्हा एकदा माजी आमदार डॉ. नरेंद्र पाटील घुले यांना संधी मिळाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत आणि जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडीकडे केवळ सहकार क्षेत्रातील निर्णय म्हणून नव्हे, तर भविष्यातील राजकीय घडामोडींचा महत्त्वाचा संकेत म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर कारखान्यातील ही बिनविरोध निवड आगामी राजकीय रणनीती आणि नेतृत्वाच्या भूमिकांवर परिणाम करणारी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.




