Breaking
ई-पेपर

*संतांना धमकी देणाऱ्यांची गय केली जाणार नाही; संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस*

0 8 9 9 9 2

*संतांना धमकी देणाऱ्यांची गय केली जाणार नाही; संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस*

अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा इशारा; सरला बेटाच्या विकासाचा आराखडा तयार, शेतकऱ्यांसाठी विविध निर्णयांची माहिती

अहिल्यानगर अस्तगाव (प्रतिनिधी) : सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांनी सुमारे १७९ वर्षांपूर्वी सुरू केलेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही त्याच भक्तिभावाने सुरू असून, या परंपरेमुळे महाराष्ट्राची संतपरंपरा, संस्कृती आणि आध्यात्मिक वारसा पिढ्यान्‌पिढ्या जपला जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अस्तगाव येथे सुरू असलेल्या सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी संतपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करत संतांना धमकी देणाऱ्यांविरोधात सरकार कठोर भूमिका घेईल, असा स्पष्ट इशारा दिला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हे सरकार काम करत आहे. संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये. संतांना धमकी देणाऱ्यांची गय केली जाणार नाही; त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”

‘हरिनामामुळे समाजाला एकत्र बांधण्याची ताकद’

अखंड हरिनाम सप्ताहाच्या परिसरातील भक्तिमय वातावरणाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईहून निघताना समुद्र दिसत होता; मात्र येथे आल्यानंतर भाविकांचा जनसागर पाहायला मिळत आहे. ही सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज आणि रामगिरी महाराज यांच्या कार्याची तसेच हरिनामाच्या भक्तीची ताकद आहे.

महाराष्ट्राची संस्कृती आणि सभ्यता हजारो वर्षांची असून अनेक आक्रमणे झाली तरी संतपरंपरा, वारकरी संप्रदाय आणि हरिनामाची परंपरा अबाधित राहिली. आक्रमकांनी किल्ले जिंकले, मंदिरे उद्ध्वस्त केली; मात्र भारतीयांच्या मनातील श्रद्धा आणि धर्मभावना बदलू शकले नाहीत. यामागे गुरुपरंपरा आणि संतांनी दिलेली विचारांची शिदोरी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या हरिनामाच्या संदेशामुळे समाजाला एकत्र बांधण्याचे काम झाले. हरिनाम संकीर्तनातून ‘माझ्यातला मी’ कमी होऊन समाजभावना आणि एकात्मता निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.

गंगागिरी महाराजांची परंपरा आजही अखंड

सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली ही अखंड हरिनामाची परंपरा अनेक पिढ्या उलटूनही आज सद्गुरु रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पुढे सुरू आहे. ही परंपरा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सरला बेटाच्या विकासाचा आराखडा तयार

सरला बेटाच्या विकासाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. सरला बेटाच्या विविध विकासकामांचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यातील कामांना सुरुवात झाली आहे. सरला बेटाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

‘शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीर’

शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी सरकार विविध निर्णय घेत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत सुमारे साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे. आगामी काळात पात्र लाभार्थ्यांच्या नवीन याद्या तयार करून त्यांच्या खात्यांमध्येही निधी वितरित केला जाईल. या योजनेअंतर्गत सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी हा केवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेचा नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यावर भर

शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे. सध्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जात असून, भविष्यात १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास, वर्षातील ३६५ दिवस वीज उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

तसेच पूर्वीच्या थकीत वीजबिलांबाबतही सरकारने मोठा निर्णय घेतला असून, सुमारे ५८ हजार कोटी रुपयांच्या थकीत वीजबिलांच्या वसुलीबाबत दिलासा देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने हजारो भाविक एकत्र येत संतपरंपरेचा जागर करत आहेत. ही परंपरा केवळ धार्मिक नसून महाराष्ट्राच्या सामाजिक एकात्मतेची आणि सांस्कृतिक वारशाची ओळख असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, संतांना धमकी देण्याच्या प्रकारांकडे सरकार गांभीर्याने पाहत असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा संदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यातून देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे