*विशेष मतदार पुनरीक्षण मोहीम सुरू; ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरण्याचे आवाहन*
१७ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी, १९ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार*

*विशेष मतदार पुनरीक्षण मोहीम सुरू; ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरण्याचे आवाहन*
१७ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी, १९ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार*
मुंबई,प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, विद्यमान मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, निर्धारित मुदतीत अर्ज भरून स्वाक्षरी केलेल्या मतदारांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.
यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना तसेच नव्या मतदारांना १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना क्र. ६ भरून मतदार नोंदणी करता येणार आहे. याच कालावधीत मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्र. ८, तर चुकीची अथवा अपात्र नोंद वगळण्यासाठी नमुना क्र. ७ भरून हरकती नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.
निवडणूक आयोगाने नागरिकांना अचूक माहिती देण्याचे आवाहन केले असून, खोटी माहिती किंवा चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अंतर्गत शिक्षा किंवा दंडाची तरतूद असल्याचा इशाराही दिला आहे.
या विशेष पुनरीक्षणानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र, त्यानंतरही लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील तरतुदीनुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करणे किंवा आवश्यक दुरुस्ती करण्याची सतत अद्ययावत (Continuous Updation) प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सर्व पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज भरून मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.



