*पावसाळी अधिवेशन २०२६ | नेवासा-श्रीरामपूरला जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील नवीन पुलासाठी १०० कोटींच्या निधीची आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची आग्रही मागणी*
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात नेवासा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी नेवासा व श्रीरामपूर या दोन महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील पुलाचा अत्यंत ज्वलंत प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. या पुलाच्या नव्या बांधकामासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.
राज्यमार्ग क्रमांक ५० वरील हा पूल नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यांमधील दळणवळणाचा प्रमुख व अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. सन १९६० मध्ये बांधण्यात आलेला हा पूल सध्या जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असून, दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सभागृहात बोलताना आमदार लंघे पाटील यांनी या मार्गावरील वाढती वाहतूक, परिसरातील आर्थिक व सामाजिक विकास तसेच शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा विचार करता, विद्यमान पुलाऐवजी आधुनिक व मजबूत नवीन पूल उभारणे ही काळाची गरज असल्याचे ठामपणे मांडले.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, शासनाने कोणताही विलंब न करता निधी मंजूर करून पुलाच्या कामाला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सभागृहात मांडलेल्या या मागणीमुळे नेवासा-श्रीरामपूर परिसरातील नागरिकांमध्ये नवीन पुलाच्या उभारणीबाबत आशा निर्माण झाली असून, शासनाच्या निर्णयाकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.




