Breaking
ब्रेकिंग

*अखंड हरिनाम सप्ताह हा भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा सुंदर संगम : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

*सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या भूमीवर भगवंताचा वास; १७९ वर्षांची परंपरा आजही अखंड सुरू*

0 8 9 9 8 1

*अखंड हरिनाम सप्ताह हा भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा सुंदर संगम : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

*सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या भूमीवर भगवंताचा वास; १७९ वर्षांची परंपरा आजही अखंड सुरू*

अहिल्यानगर (अस्तगाव ) -:

सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी १७९ वर्षांपूर्वी सुरू केलेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने सुरू आहे. या सप्ताहामुळे भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. संतांच्या विचारांनी पावन झालेल्या या भूमीवर भगवंताचा वास आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदे यांनी केले.

योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सप्ताहस्थळी हजारो भाविक, वारकरी आणि टाळकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “इथल्या अखंड नामस्मरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिभावाने आणि मांगल्याने भारून गेले आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हे सरकार काम करत आहे. संतांच्या विचारांना आणि परंपरेला धक्का लावण्याची हिंमत कोणीही करू नये.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी आणि महिलांसाठी काम करत असल्याचे सांगत शिंदे यांनी शासनाच्या विविध योजनांचा उल्लेख केला. “कोणी कितीही आटापिटा केला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या हिताला सरकारच्या तिजोरीत प्राधान्य असून, नुकताच सहा लाख शेतकऱ्यांना पाच हजार कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

‘विठ्ठलभक्तीपुढे जागतिक विक्रमही खुजा’

अखंड हरिनाम सप्ताहात आठ ते दहा हजार टाळकरी एकाच वेळी भजन-नामस्मरणात सहभागी होतात, ही या सप्ताहाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. या सप्ताहाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतल्याचा उल्लेख करत ते म्हणाले, “विठ्ठलाच्या भक्तीपुढे कोणताही जागतिक विक्रम खुजाच आहे. गिनीज बुकने या सप्ताहाची दखल घेतली आणि गिनीज बुकचेच वजन वाढले.”

सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी “लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबने को अभिमान” हा संदेश उपस्थितांना दिला. भक्तीच्या सागरातून तरून जाण्यासाठी नम्रता आवश्यक आहे; मात्र गर्व माणसाला बुडवतो, असा संतांचा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

‘या सप्ताहात पंढरपूर अवतरल्याचा अनुभव’

या सप्ताहात श्रीमंत-गरीब असा भेद राहत नाही. जातीभेद विसरून सर्वजण एकत्र येतात आणि विठ्ठलनामात तल्लीन होतात. त्यामुळे या सप्ताहाच्या निमित्ताने पंढरपूरच अवतरल्याचा अनुभव येत असल्याचे शिंदे म्हणाले.

यावेळी त्यांनी अभंगातील ओळींचा उल्लेख करत भक्तीभाव व्यक्त केला—

“काय सांगू माया तुझी श्रीरंगा,
संसाराची पंढरी केली तू पांडुरंगा…”

संत, वारकरी आणि भक्तीपरंपरेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. महाराष्ट्रात संतांचा, वारकऱ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असल्याचे सांगत “विकास भी, विरासत भी” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचाही त्यांनी उल्लेख केला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ह.भ.प. रामगिरीजी महाराज यांचे विशेष आभार मानले. “संतांच्या विचारांनी आणि भक्तांच्या आशीर्वादाने आम्हाला काम करण्याचे बळ मिळते. हे सरकार सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी आणि लाडक्या बहिणींचे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

१७९ वर्षांपासून अखंड सुरू असलेली गंगागिरी महाराजांची ही हरिनाम परंपरा भविष्यातही अखंडपणे सुरू राहावी आणि संतविचारांची पताका अशीच फडकत राहावी, अशी भावना यावेळी उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे