*ज्ञानेश्वर कारखान्याच्या चेअरमन-व्हाईस चेअरमन निवडीकडे तालुक्याचे लक्ष;*
*चंद्रशेखर घुले पाटील व ॲड. हिम्मतसिंह देशमुख यांच्या नावांची जोरदार चर्चा*
संपादकीय विश्लेषण – सोमनाथ कचरे
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मंगळवार, दि. ३० जून रोजी होणाऱ्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीकडे लागले आहे. कारखान्याच्या सभासदांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये तसेच सहकार व राजकीय वर्तुळात संभाव्य नेतृत्वाबाबत विविध चर्चांना उधाण आले असून चेअरमनपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नावाची तर व्हाईस चेअरमनपदासाठी ॲड. हिम्मतसिंह देशमुख यांच्या नावाची चर्चा आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी कारखान्याचे चेअरमन म्हणून माजी आमदार नरेंद्र पाटील घुले यांनी अत्यंत सक्षमपणे कारभार सांभाळला. कारखान्याची आर्थिक शिस्त, विकासाभिमुख निर्णय, सभासदहिताचे धोरण आणि सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान मोलाचे मानले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने विकासाची वाटचाल कायम ठेवली असून सभासदांमध्ये त्यांच्या कार्यशैलीबद्दल समाधानाची भावना आहे.
मात्र आता नव्या नेतृत्वाच्या चर्चेत माजी चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील यांचे नाव सर्वाधिक पुढे येत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या रणनीतीपूर्ण नेतृत्वाखाली यावेळी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याने त्यांच्या संघटन कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. विशेषतः तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबाबत उत्सुकता दिसून येत आहे.
स्व. मारुतराव घुले पाटील यांच्या सहकार विचारांचा वारसा पुढे नेत घुले बंधूंनी कारखान्याचा कारभार विकासाभिमुख ठेवला आहे. त्यामुळे सभासदांचा विश्वास या नेतृत्वावर सातत्याने कायम राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.
दुसरीकडे व्हाईस चेअरमन पदासाठीही राजकीय आणि सहकारी वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मागील दहा वर्षांपासून माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी व्हाईस चेअरमन म्हणून प्रभावीपणे जबाबदारी सांभाळली. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आणि प्रभाव असल्याने त्यांना सलग दोन वेळा या पदाची संधी मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या नातवाचाही संचालक मंडळात बिनविरोध समावेश झाल्याने अभंग परिवाराचे महत्त्व कायम असल्याचे मानले जात आहे.
याचबरोबर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन ॲड. देसाई देशमुख यांचे चिरंजीव ॲड. हिम्मतसिंह देशमुख हे देखील यावेळी संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. देशमुख परिवाराचा ज्ञानेश्वर कारखान्याच्या जडणघडणीत सिहंचा वाटा राहिला असून घुले परिवाराचे विश्वासू आणि एकनिष्ठ सहकारी म्हणून या परिवाराकडे पाहिले जाते. कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्येही देशमुख परिवाराचा प्रभाव आणि सभासदांमधील विश्वास लक्षणीय असल्याचे बोलले जाते.
उच्च शिक्षण, सहकार क्षेत्राची जाण, अभ्यासू वृत्ती आणि नव्या पिढीचे नेतृत्व अशी ओळख असलेल्या ॲड. हिम्मतसिंह देशमुख यांना यावेळी व्हाईस चेअरमनपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा सध्या कारखाना परिसरात रंगत आहे.
दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीत नेमकी कोणाच्या गळ्यात मानाची माळ पडणार, याकडे ज्ञानेश्वर कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते आणि संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ज्ञानेश्वर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची ही निवड केवळ कारखान्याच्या नेतृत्वापुरती मर्यादित राहणार नसून, आगामी काळात होणाऱ्या विविध सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर राजकीय निवडणुकांच्या दृष्टीनेही ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारखान्याच्या नेतृत्वातून भविष्यातील राजकीय आणि सहकारी समीकरणांना दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, कोणाच्या गळ्यात मानाची माळ पडते यावर पुढील राजकीय रणनीती आणि नेतृत्वाची वाटचाल मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार असल्याने या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे उद्याच्या निवडीकडे केवळ सभासदच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचे राजकीय व सहकारी वर्तुळ बारकाईने लक्ष ठेवून आहे.



