Breaking
ई-पेपर

*बेलापूर–परळी रेल्वेमार्गावर हालचालींना वेग; एकीकडे दिल्लीत पाठपुरावा, तर दुसरीकडे ९ ऑगस्टपासून आमरण उपोषणाची घोषणा*

0 9 5 0 2 3

*बेलापूर–परळी रेल्वेमार्गावर हालचालींना वेग; एकीकडे दिल्लीत पाठपुरावा, तर दुसरीकडे ९ ऑगस्टपासून आमरण उपोषणाची घोषणा*

नेवासा | प्रतिनिधी

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या बेलापूर–नेवासा–शेवगाव–परळी रेल्वेमार्गाच्या प्रश्नावर आता राजकीय आणि जनआंदोलन या दोन्ही पातळ्यांवर घडामोडींना वेग आला आहे. एका बाजूला आमदार विठ्ठलराव लंघे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला बेलापूर–परळी रेल्वे कृती समितीने वारंवार दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याचा आरोप करत ९ ऑगस्ट २०२६ पासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे.
दिल्ली येथे झालेल्या बैठकीत आमदार विठ्ठलराव लंघे यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि आमदार अमोल खताळ यांच्यासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन बेलापूर–परळी रेल्वेमार्गासाठी संयुक्त बैठक आयोजित करावी, सर्वेक्षण व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी केली. तसेच राहुरी–श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाबाबत बाधित शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन न्याय्य तोडगा काढण्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
दरम्यान, बेलापूर–परळी रेल्वे कृती समितीने मात्र शासन आणि लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०२६ मधील १३ दिवसांच्या आमरण उपोषणावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मुख्यमंत्री व रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ३० जून रोजी मंत्रालयासमोर झालेल्या आंदोलनादरम्यानही १५ दिवसांत मुख्यमंत्री स्तरावरील बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याचा समितीचा आरोप आहे.
यामुळे यंदाचे हे तिसरे आंदोलन असून, यावेळी केवळ आश्वासनांवर माघार घेतली जाणार नसल्याचा इशारा समितीने दिला आहे. अधिकृत निर्णय आणि प्रत्यक्ष कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी जाहीर केली आहे.
आंदोलनाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, आमदार विठ्ठलराव लंघे तसेच संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहे.
दरम्यान, दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक हालचालींना वेग येतो का आणि शासनाकडून ठोस निर्णय घेऊन कृती समितीचे प्रस्तावित आमरण उपोषण थांबविण्यात यश येते का, हा आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे. आगामी दोन दिवसांत शासनाकडून होणाऱ्या हालचालींकडे बेलापूर–परळी रेल्वेमार्गाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे