Breaking
ई-पेपरकृषीवार्ता

*अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनांना शासनाची मंजुरी*

0 9 5 0 2 3

*अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनांना शासनाची मंजुरी*

अहिल्यानगर :

खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाची तूट व अन्य घटकांमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला शासनाच्या विविध सवलती व उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
‘ट्रिगर-९’ अर्थात प्रथम कळ लागू झालेल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत अशा उपाययोजनांचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळणार आहे.
दुष्काळी परिस्थितीचा नेमका आढावा घेण्यासाठी शेतातील पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून, सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारे छायाचित्र व जीपीएस समन्वय संकलित करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न लक्षात घेऊन मनरेगाअंतर्गत कामांच्या निकषांमध्ये शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरू करण्यास, तसेच जलसंधारणाची कामे हाती घेण्यास शासनाने परवानगी दिली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या भागात आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीजजोडणी खंडित न करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश असून, शेतावर अवलंबून असलेल्या शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, तसेच जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानीबाबतची आर्थिक मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आता पीक नुकसानीच्या मदतीकडे लक्ष लागले आहे.
शासनाच्या या निर्णयाची जिल्हा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे