*माऊलींच्या दिंडीला ‘शंकरा’ची साथ; इमामपूर घाट झाला ‘ज्ञानेश्वरी घाट’*
*पैस खांबाच्या प्रतिकृतीसह एलईडी फलकाचे अनावरण; हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने ऐतिहासिक क्षण*

*माऊलींच्या दिंडीला ‘शंकरा’ची साथ; इमामपूर घाट झाला ‘ज्ञानेश्वरी घाट’*
*पैस खांबाच्या प्रतिकृतीसह एलईडी फलकाचे अनावरण; हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने ऐतिहासिक क्षण*
नेवासा | प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पावन वातावरणात इमामपूर घाटाला अखेर ‘ज्ञानेश्वरी घाट’ हे नाव लाभले. नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे ह.भ.प. वेदांताचार्य देविदास म्हस्के महाराज यांनी गेल्या वर्षी आषाढी वारीदरम्यान व्यक्त केलेली अपेक्षा यंदा प्रत्यक्षात उतरली. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकारातून आणि यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने घाटामध्ये पैस खांबाची प्रतिकृती तसेच ठळक अक्षरांत ‘ज्ञानेश्वरी घाट’ असा आकर्षक एलईडी फलक उभारण्यात आला.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. ह.भ.प. वेदांताचार्य देविदास म्हस्के महाराज, ह.भ.प. उद्धव मंडलिक महाराज, माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख, राम महाराज झिंजुर्के, यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख, मुळा कारखान्याचे संचालक, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, स्थानिक सरपंच आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्ञानेश्वरी हा केवळ ग्रंथ नसून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचा शाश्वत दीपस्तंभ आहे. त्यामुळे या घाटाला ‘ज्ञानेश्वरी घाट’ हे नाव मिळणे ही केवळ नामफलकाची घटना नसून वारकरी परंपरेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक टप्पा मानला जात आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक भाविकाला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या स्मृतीचा आणि त्यांच्या विचारांचा सातत्याने साक्षात्कार होणार आहे.
आता जबाबदारीही वाढली…
‘ज्ञानेश्वरी घाट’ हे नाव लाभल्यानंतर या परिसराचे पावित्र्य, स्वच्छता आणि सांस्कृतिक वैभव जपण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकावर आली आहे. हा घाट वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे प्रतीक म्हणून अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
युवा नेते उदयन गडाख यांचे विशेष नियोजन
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उपक्रमाचे नियोजन युवा नेते उदयन गडाख यांनी केले. पैस खांबाची आकर्षक प्रतिकृती, आधुनिक एलईडी फलकाची संकल्पना आणि उभारणीपासून अनावरण सोहळ्याच्या व्यवस्थेपर्यंत त्यांनी स्वतः विशेष लक्ष दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांनीही मोलाचे योगदान दिले.
‘ज्ञानेश्वरी घाट’ या नावामुळे आता इमामपूर घाटाला वारकरी परंपरेची नवी ओळख लाभली असून, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या स्मृतीचे हे स्थान भाविकांसाठी प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना उपस्थित वारकरी आणि नागरिकांनी व्यक्त केली.



