
जिल्हा नियोजन समितीत उद्योजक प्रभाकर शिंदे यांची निमंत्रित सदस्यपदी निवड; विकास नियोजनाला मिळणार नवी दिशा
नेवासा | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची शासनाने नव्याने पुनर्रचना केली असून, समितीवर विविध क्षेत्रातील मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये उद्योजक प्रभाकर शिंदे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याने उद्योग, रोजगार आणि विकास क्षेत्रात सकारात्मक अपेक्षा व्यक्त होत आहेत.
दि. ६ जुलै २०२६ रोजी राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित सदस्य, जिल्हा नियोजनाचा अभ्यास व ज्ञान असलेले सदस्य तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची घोषणा करण्यात आली.
समितीवर विधानमंडळ सदस्यांमधून आमदार विठ्ठलराव लंघे (नेवासा) आणि आमदार अमोल खताळ (संगमनेर) यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा नियोजन क्षेत्रातील ज्ञान व अनुभव असलेल्या विनायक देशमुख, अजय काशिद, बापूसाहेब पाटेकर आणि सौ. अनिता जगताप यांनाही समितीवर स्थान देण्यात आले आहे.
याचबरोबर उद्योजक प्रभाकर शिंदे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून झालेली निवड विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. उद्योग क्षेत्रातील अनुभव, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि विविध सामाजिक उपक्रमांतील सहभाग लक्षात घेऊन त्यांची ही नियुक्ती झाल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्यातील विकास आराखडा तयार करणे, विविध विभागांच्या योजनांना प्राधान्यक्रम देणे, निधीचे नियोजन आणि विकासकामांचा समन्वय साधणे यासाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे प्रभाकर शिंदे यांच्या सहभागामुळे उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे मांडणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला या नियुक्तीमुळे नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




