Breaking
ई-पेपर

*सुरेगाव येथे साडेतीन शक्तीपीठ मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न*

0 8 9 9 5 9

*सुरेगाव येथे साडेतीन शक्तीपीठ मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न*

बेलपिंपळगाव प्रतिनिधी -: महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील सुरेगाव (गंगा) येथे साडेतीन शक्तीपीठांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा दि. २७ ते २९ एप्रिल २०२६ रोजी साधुसंतांच्या आशीर्वादाने व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुकामाता व वणीची श्री सप्तशृंगी या चारही देवींच्या मनमोहक मूर्तींची महंत ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के नेवासा आणि ह.भ.प. रमेशानंदगिरीजी महाराज, श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर देवस्थान हंडीनिमगाव यांच्या शुभहस्ते वैदिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सकाळी ९:१५ च्या शुभ मुहूर्तावर मंदिराच्या शिखरावर कलशारोहण करण्यात आले. यावेळी ‘आई राजा उदो उदो’ च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला.

दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सुरेगाव येथील जगदंब मित्र मंडळाने गावात साडेतीन शक्तीपीठांचे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. आज बुधवार दि. २९ एप्रिल रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याने तो संकल्प पूर्णत्वास गेला.

या सोहळ्यानिमित्त तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सकाळी ९ वाजता ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या उत्सव मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर मंगल कलश घेतले होते. महिला-भगिनींनी मिरवणूक मार्गावर सडा-रांगोळी काढून व हळद-कुंकू लावून देवीच्या मूर्तीचे जागोजागी पूजन केले. यानंतर तीन दिवसीय कार्यक्रमात मंदिरासमोर पंचगुरूंच्या हस्ते होमहवन, लघुरुद्र व अभिषेक करण्यात आला. फुलांची सजावट व जगदंब मित्र मंडळाने मंदिर परिसरात लावलेल्या भगव्या ध्वजामुळे संपूर्ण गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. मूर्ती प्रतिष्ठेनिमित्त मंदिरात दोन दिवस रात्री समस्त भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बुधवारी सकाळी ९:३० ते ११:०० या वेळेत ह.भ.प. रमेशानंदगिरीजी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास जगदंब मित्र मंडळ, समस्त भजनी मंडळ सुरेगाव व पंचक्रोशीतील महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*विशेष म्हणजे*: या मंदिराचे संपूर्ण बांधकाम समस्त गावकरी व परगावी दिलेल्या लेकींनी यथाशक्ती देणगी देऊन पूर्ण केले आहे. माहेरच्या ओढीने लेकींनी केलेल्या मदतीमुळे हा सोहळा यशस्वी झाला, असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे