Breaking
ई-पेपरकृषीवार्ता

*कमी पाण्यातही बाजरीचे बहारदार पीक; दिघी शिवारातील प्रयोग ठरतोय शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण*

0 8 9 9 8 9

कमी पाण्यातही बाजरीचे बहारदार पीक; दिघी शिवारातील प्रयोग ठरतोय शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

नेवासा तालुका : पावसाचा खंड, कमी पाण्याची उपलब्धता आणि हलकी-मुरमाड जमीन अशा प्रतिकूल परिस्थितीतही बाजरीचे जोमदार पीक घेता येते, हे नेवासा तालुक्यातील दिघी शिवारातील प्रात्यक्षिक प्लॉटने दाखवून दिले आहे. गोंडेगाव चौफुली परिसरातील नजीक चिंचोलीचे माजी सरपंच तथा शेतकरी पोपटराव पाठक यांच्या शेतावर तेलंगणा येथील धान्या सीड कंपनीने बाजरीच्या सहा नवीन संकरित वाणांचा प्रात्यक्षिक प्लॉट घेतला असून, कमी पाण्यातही या पिकाची झालेली दमदार वाढ परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

या प्रात्यक्षिक प्लॉटची कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके आणि बियाणे तज्ज्ञ अधिकारी सुभाष पाठक यांनी पाहणी केली. यावेळी पिकाची वाढ, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता तसेच उत्पादनाच्या दृष्टीने विविध बाबींची पाहणी करण्यात आली.

एकरी दहा क्विंटलपर्यंत उत्पादनाची अपेक्षा

नवीन संकरित वाणांपासून सरासरी एकरी दहा क्विंटलपर्यंत धान्य उत्पादन मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वाणांची ताटे तब्बल आठ ते नऊ फूट उंच वाढत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पानांची रुंदी चांगली असल्याने चाऱ्याची गुणवत्ता देखील उत्तम राहणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

पावसाच्या खंडातही पिकाची दमदार वाढ

सध्या अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडला असतानाही या प्रात्यक्षिक प्लॉटमधील बाजरीच्या वाढीवर त्याचा विशेष परिणाम झालेला दिसून येत नाही. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असलेल्या या संकरित वाणामुळे कमी पाण्यातही पीक हिरवेगार आणि जोमदार राहिल्याचे प्रात्यक्षिकातून दिसून आले आहे.

एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी शेतकऱ्यांनी तूर आणि बाजरीसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचा सल्ला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर दिघी शिवारातील हा प्रयोग कमी पाणी आणि हलकी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

शेतकरी पाठक यांच्या प्रयत्नांचे कौतुक

मंडल कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांनी प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी करून शेतकरी पोपटराव पाठक यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक केले. या पिकातून चांगले उत्पादन मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बियाणे तज्ज्ञ अधिकारी सुभाष पाठक यांनी परिसरातील शेतकऱ्यांनी पुढील हंगामात नवीन वाणांचे प्रात्यक्षिक प्लॉट व पायलट योजना राबविण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले. रब्बी हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आतापासूनच नियोजनबद्ध पद्धतीने पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आपल्या शेतावरील प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या कृषी तज्ज्ञ व अधिकाऱ्यांचे पोपटराव पाठक यांनी आभार मानले.

कमी पाणी, हलकी जमीन आणि प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही बहरलेले बाजरीचे हे पीक परिसरातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच आशादायी ठरत असून, या नवीन संकरित वाणाच्या उत्पादनक्षमतेकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे