*नेवासा तहसील कार्यालयात तीन वर्षांपासून लोकशाही दिनच नाही? नागरिकांमध्ये संताप; तहसीलदार व लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*
*नेवासा तहसील कार्यालयात तीन वर्षांपासून लोकशाही दिनच नाही? नागरिकांमध्ये संताप; तहसीलदार व लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*
नेवासा | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचून त्यांचे तातडीने निवारण व्हावे, यासाठी शासनाने लोकशाही दिनाची संकल्पना राबविली आहे. मात्र नेवासा तहसील कार्यालयात गेल्या तीन वर्षांपासून एकही लोकशाही दिन आयोजित करण्यात आला नसल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणाची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाला घ्यावी लागल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकशाही दिनाचे आयोजन होत नसल्याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित तहसीलदारांकडे कार्यवाहीसाठी पत्र पाठविले आहे. शासनाच्या निर्देशांनुसार नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निवारण करण्यासाठी लोकशाही दिन नियमित घेणे अपेक्षित असताना, गेल्या तीन वर्षांत असा एकही उपक्रम न झाल्याचा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरला आहे.
तालुक्यातील अनेक नागरिकांचे महसूल, जमीन, दाखले, अतिक्रमण, शासकीय योजना आणि विविध प्रशासकीय प्रश्न प्रलंबित असताना लोकशाही दिन न झाल्याने नागरिकांना न्यायासाठी वरिष्ठ कार्यालयांचे दरवाजे ठोठवावे लागत असल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात नेवासा तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असून, लोकशाही दिनासारख्या महत्त्वाच्या उपक्रमाची अंमलबजावणी का झाली नाही, याबाबत नागरिकांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली जात आहे.
तसेच, तालुक्यातील विविध प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या गंभीर बाबीकडे लक्ष का दिले नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लोकशाही दिन होत नसल्याची बाब तीन वर्षे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास कशी आली नाही, याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, लोकशाही दिन हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नसून प्रशासन आणि जनतेमधील विश्वासाचा दुवा आहे. तोच उपक्रम वर्षानुवर्षे होत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी उपलब्ध असलेले महत्त्वाचे व्यासपीठच बंद पडल्यासारखी परिस्थिती निर्माण होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने या विषयाची दखल घेतल्याने आता नेवासा तहसील प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, लोकशाही दिन पुन्हा नियमितपणे सुरू होणार का आणि याबाबत जबाबदारी निश्चित होणार का, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“लोकशाही दिन बंद, नागरिकांच्या समस्या प्रलंबित आणि प्रशासन मौन”, अशी भावना अनेक नागरिकांकडून व्यक्त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.




