*नेवासा विकासाला महायुतीची गती; जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – डॉ. सुजय विखे*
*कुकाणा बसस्थानकाला अखेर हिरवा कंदील मिळण्याची चिन्हे*

*नेवासा विकासाला महायुतीची गती; जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – डॉ. सुजय विखे*
*कुकाणा बसस्थानकाला अखेर हिरवा कंदील मिळण्याची चिन्हे*
नेवासा (प्रतिनिधी): महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र, कुकाणा येथे आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या सुसज्ज निवासी इमारतीचे लोकार्पण माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळत असून जनतेचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील, अशी ठाम ग्वाही दिली.
लोकार्पणानंतर आयोजित सभेत बोलताना डॉ. विखे म्हणाले, “विकास हीच आमची बांधिलकी असून महायुती सरकारच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासकामांसोबतच तालुक्यात गुंडगिरीच्या प्रवृत्तीमुळे निर्माण झालेली घाण साफ करण्याचे कामही हाती घेतले आहे. कायदा-सुव्यवस्था आणि विकास या दोन्ही बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यासाठी विविध विकासकामांचा पाठपुरावा सुरू असून महायुती सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कुकाणा ग्रामपंचायत इमारतीसाठी अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन डॉ. विखे यांनी दिले. तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कुकाणा बसस्थानकाच्या प्रश्नावरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. कार्यक्रमानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जागेबाबत माहिती घेत संबंधित मंत्र्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती देण्यात आली.
आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सांगितले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून नियोजन मंडळातून नेवासा तालुक्यास मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे तालुक्यातील विकासकामांना मोठी चालना मिळणार असून कुकाणासह संपूर्ण परिसराच्या विकासाला नवे बळ मिळेल.
आरोग्य विभागाच्या नव्या निवासी इमारतीमुळे ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर्जेदार निवासाची सुविधा उपलब्ध होणार असून त्यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान व परिणामकारक होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंगजी अभंग होते. व्यासपीठावर नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, अंकुशराव काळे, अब्दुल शेख, सरपंच लता अभंग,मछिंद्र कावरे,दिनकरराव गर्जे,डॉ. बाळासाहेब कोलते,भाजप तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे, मनोज पारखे, राजेंद्र मते, अमोल अभंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भागवत दहिफळे यांनी केले, तर आभार डॉ. दीपक डिंबर यांनी मानले. कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुकाणा बसस्थानकाला अखेर हिरवा कंदील मिळण्याची चिन्हे
कुकाणा गावाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बसस्थानकाच्या प्रश्नाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कार्यक्रमानंतर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बसस्थानकासाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून जागा हस्तांतरणासह पुढील प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्याची माहिती देण्यात आली.




