*मुळा कारखाना निवडणुकीत ४९.५५ टक्के मतदान; विरोधकांच्या अपूर्ण पॅनलची दिवसभर चर्चा एकतर्फी लढतीचा मतदानावर परिणाम? आता निकालाकडे तालुक्याचे लक्ष*
*मुळा कारखाना निवडणुकीत ४९.५५ टक्के मतदान; विरोधकांच्या अपूर्ण पॅनलची दिवसभर चर्चा
एकतर्फी लढतीचा मतदानावर परिणाम? आता निकालाकडे तालुक्याचे लक्ष*
नेवासा | प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २६ जून) शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या मतदानात एकूण १६ हजार ९४४ मतदारांपैकी ८ हजार ३९५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. अंतिम मतदानाची टक्केवारी ४९.५५ इतकी नोंदविण्यात आली. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने त्यामागील राजकीय समीकरणांची चर्चा दिवसभर रंगली.
या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल आणि आमदार विठ्ठलराव लंघे तसेच उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी यांच्यात प्रमुख सामना झाला. मात्र, विरोधी गटाला सर्व जागांवर उमेदवार उभे करता न आल्याने निवडणूक सुरुवातीपासूनच तुलनेने एकतर्फी झाल्याची भावना अनेक सभासदांमध्ये दिसून आली.
करजगाव गटातून सहकार पॅनलकडून चंद्रकांत भानुदास टेमक व ज्ञानेश्वर रामराव दरंदले, तर महिला प्रतिनिधी मतदारसंघातून कमल चांगदेव दहिफळे व विमल नारायण सोनवणे हे उमेदवार रिंगणात आहेत. विरोधी गटाकडून करजगाव गटात केवळ किरण जाधव आणि नारायण डवले यांनी उमेदवारी दाखल केली. महिला राखीव गटातील मीराबाई दिवटे यांनी सहकार पॅनलला पाठिंबा जाहीर केल्याने विरोधकांचे संपूर्ण पॅनल उभे राहू शकले नाही.
प्रचारादरम्यान दोन्ही गटांनी सभा, पदभ्रमण, बैठका आणि समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. विकासकामे, कारखान्याचे भवितव्य आणि सहकारातील नेतृत्व या मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मात्र मतदानाच्या दिवशी संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली.
सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर मतदारांची चांगली गर्दी होती. दुपारनंतर मतदानाचा वेग मंदावला, तर शेवटच्या तासात काही प्रमाणात पुन्हा मतदानासाठी मतदारांनी हजेरी लावली. निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.
कमी मतदानाचे संकेत काय?
कारखान्यासारख्या महत्त्वाच्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीत अवघे ४९.५५ टक्के मतदान झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजकीय जाणकारांच्या मते, विरोधी गटाला सर्व जागांवर उमेदवार देता न आल्याने अपेक्षित चुरस निर्माण झाली नाही. त्यामुळे काही सभासदांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, सहकार पॅनलने आपली संघटनात्मक ताकद कायम ठेवत समर्थकांना मतदानासाठी बाहेर काढण्यात यश मिळवल्याचेही बोलले जात आहे. मात्र कमी मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार, याचे उत्तर मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
गटनिहाय मतदान
• सोनई – १,७४४
• घोडेगाव – १,३८७
• खरवंडी – १,४४४
• करजगाव – १,४४३
• नेवासा – १,१३५
• प्रवरा संगम – १,२४१
एकूण मतदान : ८,३९५
मतदानाची अंतिम टक्केवारी : ४९.५५%
आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलचे कारखान्यावरील वर्चस्व कायम राहणार की विरोधी गट अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळवत राजकीय संदेश देणार, याचा फैसला मतमोजणीनंतर होणार असून जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे




