*मुळा उजवा कालवा ढासण्याच्या स्थितीत; चांदा परिसरात प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा*
*चांदा, बराणपूर, रस्तापूर, वडाळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन*

मुळा उजवा कालवा ढासण्याच्या स्थितीत; चांदा परिसरात प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
चांदा, बराणपूर, रस्तापूर, वडाळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन
नेवासा प्रतिनिधी : चांदा, बराणपूर, रस्तापूर, वडाळा परिसरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे. चांदा परिसरातील मुळा उजवा कालवा ढासण्याच्या स्थितीत असल्याने संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी ओढे, नाले व नदीपात्रापासून सुरक्षित अंतरावर राहावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
कालवा परिसर तसेच ओढ्या-नाल्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. तसेच नाल्यांच्या किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या आसपास असलेल्या जनावरांच्या शेड्स रिकाम्या करून जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेता शनिवारी रात्री प्रशासनाच्या वतीने गावागावांत वाहनाद्वारे ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही परिस्थितीत धोकादायक भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिस्थितीवर संबंधित यंत्रणांकडून लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.




