*तरवडी उपकेंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
तरवडी उपकेंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेवासा | प्रतिनिधी
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत तरवडी आरोग्य उपकेंद्रात रविवार (दि. २८ जून) रोजी पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. पालकांनी आपल्या चिमुकल्यांना लसीकरणासाठी आणत मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी आरोग्य सेवक जे. डी. पाटील यांनी उपस्थित पालकांना पोलिओ लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी प्रत्येक पाच वर्षांखालील बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे अत्यावश्यक असून, यामुळे बालकांचे पोलिओसारख्या गंभीर आजारापासून संरक्षण होते, असे सांगितले. नियमित लसीकरणाबरोबरच राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेतील प्रत्येक फेरीत बालकांना लस देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आशा सेविका एस. बी. भारस्कर, जे. एस. जगदाळे आणि एम. के. पुंड यांनी घरोघरी जनजागृती करून लाभार्थी बालकांना लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
आरोग्य विभागाने लसीकरणापासून कोणतेही बालक वंचित राहू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असून, राहिलेल्या लाभार्थ्यांना पुढील तीन दिवस घरोघरी भेट देऊन पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
“प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब – निरोगी व पोलिओमुक्त भारतासाठी आपली सामूहिक जबाबदारी”, असा संदेश आरोग्य विभागाच्या वतीने यावेळी देण्यात आला.




