Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

#दुष्काळाचे सावट…

0 9 5 0 2 3

#दुष्काळाचे सावट…

विशेष लेख – दुर्गेश राजमाने (tv9)

सध्या दुष्काळाचे सावट बळीराजावर आलंय… वाढत्या महागाईच्या प्रमाणात शेती करणंही कठीण झालंय. कधी बाजारभाव असतो, तर कधी बाजारभाव नसतो… मात्र रासायनिक खतं आणि औषधांचे भाव कधीच कमी होत नाहीत…

कांद्याला तीन रुपये भाव मिळतो, तर कधी तो एक रुपयावर येतो… पण खताच्या गोणीचे भाव पाच रुपयांनी कमी झाले, असं कुठे दिसत नाही. या सगळ्याच्या तुलनेत शेती करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. त्या संकटातून कसाबसा सावरत असतानाच आता दुष्काळाचं सावट बळीराजावर आलंय.
शेतकऱ्यांची व्यथा शेतकरी आहे, त्यालाच कळते…

ज्या शेतात पिकवलेल्या पिकावर त्याने अनेक स्वप्नं रंगवलेली असतात. कुणाच्या घरात लग्न असतं, तर कुणाला दवाखान्याचा खर्च असतो… संपूर्ण घराचा गाडा हा शेतकऱ्याच्या शेतीवरच अवलंबून असतो. मात्र पीक हातातून गेलं की या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर होतो… आणि हाती काहीच उरत नाही.

जो शेतकरी २४ तास आपल्या शेतात राबतो, त्या शेतकऱ्याचा जीव आज पार खाली-वर होतोय. कारण त्याला रिकामं बसायची सवय नसते. सतत त्याचे हात शेतात काही ना काही काम करत असतात. मात्र आज दुष्काळाच्या सावटाने हाच बळीराजा चिंतेत आहे.

जे शेतमजूर म्हणून इतरांच्या शेतात काम करायला जातात, त्यांचाही रोजगार बंद झाला आहे. आज त्यांची परिस्थितीही खूप बिकट आहे. ज्याला आपण ‘जगाचा पोशिंदा’ म्हणतो, तोच आज भयंकर संकटात सापडला आहे.

ज्या शेतमजुरांची चूल इतरांच्या शेतात मजुरी करून मिळणाऱ्या पैशांवर चालते, ती चूल आता बंद होण्याची वेळ आली आहे. गुराढोरांना लागणाऱ्या चाऱ्याचाही प्रश्न आज ना उद्या गंभीर होणार आहे…

सरकार आज ना उद्या शेतकऱ्यांना मदत करेल… पण या सरकारी मदतीने खरंच त्याचं भागणार आहे का?
वरुणराजा, तू यंदा बरसला असतास तर ही वाईट वेळ शेतकऱ्यांवर आली नसती… बळीराजाची दिवाळीही गोड झाली असती…

दुर्गेश राजमाने .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे