
*ब्रेकिंग | महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय
स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा शासनमान्य समावेश; २२ जुलै रोजी राज्यभर अभिवादन कार्यक्रम*
मुंबई | प्रतिनिधी/ महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी करत स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा राज्य शासनाच्या अधिकृत जयंती व राष्ट्रीय दिन कार्यक्रमांमध्ये समावेश केला आहे. या निर्णयानुसार २२ जुलै २०२६ (बुधवार) रोजी राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये व शाळांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
१५ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यालय प्रमुखांना आवश्यक सूचना देऊन कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, स्व. अजित अनंतराव पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी राहुरी तालुक्यातील देवळाली-प्रवर येथे झाला होता. प्रशासनातील कार्यक्षमता, विकासाभिमुख निर्णयक्षमता आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे त्यांनी राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती. वित्त, नियोजन, ऊर्जा, नगरविकास, कृषी, उद्योग यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी विविध विकासकामांना गती दिली होती.
जनसामान्यांमध्ये “अजितदादा” या नावाने लोकप्रिय असलेल्या स्व. अजित पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या जयंतीचा शासनमान्य कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
शासनाचे हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, याची अंमलबजावणी राज्यभर करण्यात येणार आहे.




