*खमके अधिकारी तुकाराम मुंडे यांचे गावोगावी फलक; जनतेकडून उत्स्फूर्त समर्थन*
*कुकाण्यातही झळकला मुंडे यांचा फलक*
*खमके अधिकारी तुकाराम मुंडे यांचे गावोगावी फलक; जनतेकडून उत्स्फूर्त समर्थन*
कुकाण्यातही झळकला मुंडे यांचा फलक
अहिल्यानगर/प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
आपल्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि धडाकेबाज कार्यशैलीमुळे राज्यभर चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विविध गावांमध्ये त्यांच्या समर्थनार्थ फलक झळकू लागले असून नागरिकांकडून त्यांच्या कार्यपद्धतीचे खुलेपणाने कौतुक केले जात आहे.
कुकाणा परिसरात लावण्यात आलेल्या एका फलकावर “प्रामाणिकपणा हीच खरी ताकद” असा संदेश देत तुकाराम मुंडे यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. या फलकांमधून प्रशासनातील पारदर्शकता, कठोर निर्णयक्षमता आणि जनहितासाठी केलेल्या कार्याबद्दल नागरिकांमध्ये असलेला विश्वास अधोरेखित होत आहे.
सध्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या तुकाराम मुंडे यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ व बनावट औषधांविरोधात धडक कारवाया सुरू केल्या आहेत. त्यांच्या या कारवाईमुळे राज्यभर चर्चा रंगली असून शेतकरी, नागरिक व विविध सामाजिक घटकांकडून त्यांना समर्थन मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांत आपल्या निर्भीड कार्यशैलीमुळे तुकाराम मुंडे हे जनसामान्यांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. त्यामुळेच त्यांच्या समर्थनार्थ गावोगावी फलक झळकत असून “प्रामाणिक अधिकारी म्हणून मुंडे साहेबांची गरज महाराष्ट्राला आहे” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावरही त्यांच्या कामकाजाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असल्याचे दिसून येते.
छायाचित्र ओळ : कुकाणा परिसरात लावण्यात आलेला तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ फलक.




