Breaking
ई-पेपरकृषीवार्ता

*शेतकरी संरक्षण कायदा २०२६ चा मसुदा अण्णा हजारेंकडे सुपूर्द*

*शेतकरी संरक्षण कायदा ही काळाची गरज”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे अण्णा हजारेंचे आश्वासन*

0 9 5 0 2 3

*शेतकरी संरक्षण कायदा २०२६ चा मसुदा अण्णा हजारेंकडे सुपूर्द*

*शेतकरी संरक्षण कायदा ही काळाची गरज”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे अण्णा हजारेंचे आश्वासन*

अहिल्यानगर | महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

शेतकऱ्यांना शेती करताना भेडसावणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, वन्यप्राण्यांचे हल्ले, सर्पदंश आणि विविध संकटांपासून संरक्षण मिळावे, यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘शेतकरी संरक्षण कायदा मसुदा २०२६’ यावर पद्मविभूषण अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत राळेगण सिद्धी येथे १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सविस्तर व अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी अण्णा हजारे यांनी शेतकरी संरक्षण कायदा ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत, या मसुद्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने विनंती करणार असल्याचे सांगितले.

या चर्चेत माजी कुलगुरू डॉ. अशोकराव ढगे, प्रदेशाध्यक्ष अशोकराव सब्बन, ज्येष्ठ भ्रष्टाचारविरोधी नेते रामराव पाटील भदगले आणि नेवासा तालुका उपाध्यक्ष कल्याणराव मुरूमकर सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा सर्वंकष विचार करून त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे, हा या चर्चेचा प्रमुख विषय होता.

शेतीच्या पूर्वमशागतीपासून पेरणी, पीक व्यवस्थापन आणि थेट पीक कापणीपर्यंत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा विचार करून शेतकरी संरक्षण कायदा २०२६ चा मसुदा तयार करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोकराव सब्बन यांनी दिली. शेती हा केवळ व्यवसाय नसून देशाच्या अन्नसुरक्षेचा आधार आहे. त्यामुळे शेती करताना शेतकऱ्यांच्या जीविताला, श्रमाला आणि आर्थिक सुरक्षिततेला निर्माण होणाऱ्या धोक्यांचा विचार कायद्याच्या चौकटीत होणे आवश्यक असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

माजी कुलगुरू डॉ. अशोकराव ढगे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी संरक्षण व्यवस्थांचा संदर्भ देत, प्रगत देशांमध्ये शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी विविध कायदे व व्यवस्था असल्याचे सांगितले. अमेरिका आणि इस्रायलसह अन्य देशांतील कृषी संरक्षणाच्या उपाययोजनांचा अभ्यास करून भारतातील शेतकऱ्यांसाठीही प्रभावी कायदेशीर तरतुदी असाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्पदंश, जंगली डुकरांचे व बिबट्यांचे हल्ले, ढगफुटी, ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ यांसारख्या संकटांमुळे शेतकऱ्यांना होणारे नुकसान आणि जीवितहानी लक्षात घेऊन त्यांना संरक्षण देणारा कायदा आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शेतकरी संरक्षण कायदा २०२६ च्या मसुद्याची प्रत कल्याणराव मुरूमकर आणि रामराव पाटील भदगले यांच्या हस्ते अण्णा हजारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी हा मसुदा राज्य शासनापर्यंत पोहोचवून त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे, यासाठी पुढाकार घेण्याची विनंती अण्णा हजारे यांना केली. त्यावर मसुदा अभ्यासपूर्ण असल्याचा अभिप्राय देत, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने विनंती करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.

याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे लिखित ‘कृषी तरंग’ या पुस्तकाची प्रतही अण्णा हजारे यांना सस्नेह भेट देण्यात आली. प्रदीर्घ आणि सविस्तर चर्चेनंतर सोनू भैय्या पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच अण्णा हजारे यांचे सहाय्यक अन्सार शेख यांनी या विषयासंदर्भातील पुढील कार्यवाहीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली.

शेतकऱ्यांच्या जीविताचे आणि शेतीच्या प्रक्रियेत येणाऱ्या संकटांचे संरक्षण करणारा कायदा प्रत्यक्षात यावा, ही या बैठकीतून व्यक्त झालेली प्रमुख अपेक्षा आहे. आता या मसुद्याबाबत राज्य शासनाच्या पातळीवर कोणती पावले उचलली जातात, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे