*कुकाणा बसस्थानकाच्या उभारणीसाठी हालचालींना वेग; प्रस्तावित जागेची आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची पाहणी*

*कुकाणा बसस्थानकाच्या उभारणीसाठी हालचालींना वेग; प्रस्तावित जागेची आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची पाहणी*
*नेवासा प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क*
नेवासा मतदारसंघातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या कुकाणा येथे आधुनिक व सुसज्ज बसस्थानक तसेच व्यापारी संकुल उभारण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला असून, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.
कुकाणा परिसरातील सुमारे २५ ते ३० गावांतील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि प्रवाशांना दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) ताब्यातील गट क्र. १४२ मधील १ हेक्टर १४ आर (सरकारी बंगला) जागा बसस्थानक व व्यापारी संकुलासाठी वर्ग करून मिळावी, अशी मागणी आमदार लंघे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित जागा एसटी महामंडळाकडे हस्तांतरित होऊन पुढील प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी, यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
याच अनुषंगाने विभागीय स्थापत्य अभियंता (अहिल्यानगर) अविनाश अण्णासाहेब मंजुळे, नेवासा आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक प्रशांत ज्ञानदेव होले तसेच आगार व्यवस्थापक संदीप पूजा ढवळे यांच्या उपस्थितीत प्रस्तावित जागेची तांत्रिक व वाहतूक सुविधांच्या दृष्टीने सविस्तर पाहणी करण्यात आली.
यावेळी आमदार लंघे पाटील यांनी स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. कुकाणा येथे नवीन बसस्थानक व व्यापारी संकुलाचा प्रकल्प लवकर मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, यासाठी पुढेही सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणीवेळी स्थानिक सरपंच, उपसरपंच सदस्य ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी, एसटी महामंडळाचे अधिकारी तसेच कुकाणा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुकाणा येथे झालेल्या एका कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही कुकाणा बसस्थानकाच्या उभारणीसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. तसेच, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील हे संघर्षातून घडलेले लोकप्रतिनिधी असून, त्यांच्या माध्यमातून जनतेची सेवा अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
कार्यक्रमानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित जागेची माहिती घेत संबंधित विभागाच्या मंत्र्यांशीही दूरध्वनीवर चर्चा केली. त्यामुळे बसस्थानकासाठी आवश्यक जागा उपलब्ध होण्याची प्रक्रिया गती घेईल आणि कुकाणा बसस्थानकाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी व्यक्त केला.




