*माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पाठपुराव्याला यश; कुकाणा–पुणे थेट बससेवा सुरू!*
*पत्रव्यवहारानंतर अवघ्या पंधरा दिवसांत बससेवा सुरळीत; कुकाणा बसस्थानकावर प्रवाशांकडून जल्लोषात स्वागत*

*माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पाठपुराव्याला यश; कुकाणा–पुणे थेट बससेवा सुरू!*
*पत्रव्यवहारानंतर अवघ्या पंधरा दिवसांत बससेवा सुरळीत; कुकाणा बसस्थानकावर प्रवाशांकडून जल्लोषात स्वागत*
नेवासा | प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क
कुकाणा, चांदा, घोडेगाव मार्गे शेवगाव ते पुणे ही बससेवा सुरू व्हावी, या प्रवाशांच्या मागणीला अखेर यश आले असून, नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पाठपुराव्यामुळे ही बससेवा सुरू झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच अहिल्यानगर विभाग नियंत्रक यांच्याकडे मुरकुटे यांनी पत्रव्यवहार करून ही सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत अवघ्या पंधरा दिवसांत बससेवा सुरळीत झाल्याने कुकाणा परिसरातील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वा या बसचे कुकाणा बसस्थानकावर आगमन होताच परिसरातील प्रवाशांनी आणि ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेली थेट पुणे बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे. यापूर्वी पुण्याला जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बस बदलण्याची कसरत करावी लागत होती. त्यामुळे वेळ, श्रम आणि प्रवासातील गैरसोय सहन करावी लागत होती. मात्र, या थेट बससेवेमुळे प्रवाशांची या त्रासातून मुक्तता होणार असून, कुकाणा परिसरातून पुण्याला जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
*प्रवाशांच्या प्रश्नासाठी मुरकुटे यांचा पुढाकार*
सर्वसामान्य प्रवाशांची गरज लक्षात घेऊन माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी परिवहन मंत्री आणि विभाग नियंत्रक यांच्याकडे पत्रव्यवहार करत बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रितेश भंडारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश मिळाल्याने कुकाणा व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
केवळ मागणी करून न थांबता संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यास जनतेचे प्रश्न मार्गी लागू शकतात, याचे उदाहरण या बससेवेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. थेट पुणे बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसेच पुण्याला विविध कामांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
यावेळी रितेश भंडारी, कुमार देशमुख, अशोक मंडलिक, रज्जाक इनामदार, रफिक शेख, योगेश सोनवणे, संजय भंडारी, नितीन निकम, श्रीमंत मासाळ, विजय गांधी, चंपू शेठ बोरा सुनील विधाटे,यांच्यासह कुकाणा परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ व प्रवासी उपस्थित होते. बससेवा सुरू झाल्याने उपस्थितांनी आनंद व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.




