*शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीण युवक-युवतींनी शेळीपालनाकडे वळावे : डॉ. क्षितिज घुले*
*कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे आधुनिक शेळीपालन व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न*

*कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे आधुनिक शेळीपालन व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न*
*शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीण युवक-युवतींनी शेळीपालनाकडे वळावे : डॉ. क्षितिज घुले*
अहिल्यानगर –
दहिगाव-ने, ता. शेवगाव अल निनोच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीचा शेती व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामीण युवक व शेतकऱ्यांनी शेतीला सक्षम जोडधंदा म्हणून आधुनिक शेळीपालन व्यवसायाकडे वळावे. योग्य तंत्रज्ञान, जातीची निवड, करडांचे संगोपन आणि बाजारपेठेचे नियोजन केल्यास शेळीपालनातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते, असे प्रतिपादन पंचायत समिती शेवगावचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी केले.
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, कृषी विज्ञान केंद्र यांच्या प्रायोजकत्वाखाली दि. ७ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान ‘आधुनिक शेळीपालन व्यवसाय व्यवस्थापन’ या विषयावर ग्रामीण युवक व युवतींसाठी पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात डॉ. क्षितिज घुले मार्गदर्शन करत होते.
संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील तसेच डॉ. क्षितिज घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज सुरू आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-नेचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. कौशिक यांच्या हस्ते झाले.
प्रशिक्षणादरम्यान कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागातील अधिकारी तसेच जिल्ह्यातील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकऱ्यांनी आधुनिक शेळीपालन तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि बाजारपेठ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
‘कमी जागेत अधिक नफा देणारे शेळीपालन’ या विषयावर प्रगतिशील शेतकरी कमलेश वाघमोडे यांनी शेळीपालनातील दैनंदिन व्यवस्थापनाचे बारकावे सांगितले. नितीन म्हस्के यांनी बोकड विक्री व्यवसायातील संधी व बाजारपेठेचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गायकवाड यांनी प्रति शेळी पाच वर्षांच्या उत्पादनातून ३१० किलो मांस उत्पादनाचे गणित, तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.
चांगल्या जातीच्या शेळ्यांची निवड, करडांचे योग्य संगोपन तसेच पैदाशीसाठी योग्य बोकडाची निवड यामध्ये शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास शेळीपालनातून चांगले उत्पादन व आर्थिक फायदा मिळवता येतो, असा विश्वास पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पारखे यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. क्षितिज घुले म्हणाले की, “दुष्काळसदृश परिस्थितीत केवळ पावसावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शेतीसोबत शेळीपालनासारखा कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि नियमित उत्पन्नाची संधी देणारा व्यवसाय ग्रामीण युवकांनी स्वीकारणे गरजेचे आहे.” कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शनाचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन पशुधन उत्पादन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर गवळी यांनी केले. सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) इंजी. राहुल पाटील यांनी केले, तर डॉ. एस. एस. कौशिक यांनी आभार मानले.
कार्यक्रमास हसनापूर, ता. शेवगाव येथील कृष्णा महिला स्वयंसहायता समूहातील महिला तसेच परिसरातील शेतकरी बचत गटांच्या महिला व ग्रामीण युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणिक लाखे, सचिन बडधे व नंदकिशोर दहतोंडे यांनी सहकार्य केले.
आधुनिक तंत्रज्ञान, प्रत्यक्ष शेळीपालनाचा अनुभव, पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि बाजारपेठेची माहिती यांचा संगम घडवून आणणारे हे प्रशिक्षण ग्रामीण युवक-युवतींसाठी शेळीपालन व्यवसायाची नवी दिशा देणारे ठरले.




