*खाकी वर्दीतील देवमाणूस! सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्याकडून अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*खाकी वर्दीतील देवमाणूस!
सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्याकडून अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
प्रतिनिधी : मोहन शेगर | सोनई
समाजातील वंचित, अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या उदात्त हेतूने सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले. घोडेगाव येथील महात्मा फुले बालसंगोपन केंद्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांनी “पोलीस म्हणजे केवळ कायद्याचे रक्षक नव्हे, तर समाजाचे आधारवडही आहेत,” याची प्रचिती घडवून दिली.
दि. २९ जून रोजी सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले बालसंगोपन केंद्राला भेट दिली. या केंद्रात भटक्या-विमुक्त समाजातील अनाथ, निराधार, ऊसतोड कामगार, वीटभट्टी मजूर तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील शिक्षणापासून वंचित मुला-मुलींच्या शिक्षणासाठी उल्लेखनीय कार्य केले जाते.
यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून उपस्थित अधिकारीही भावूक झाले. शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेला हा छोटासा हातभार त्यांच्या आयुष्यात मोठी प्रेरणा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. आर. आडकिते, पोलीस कॉन्स्टेबल भगवान वाघमोडे तसेच सोनई पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ चौगुले यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. समाजातील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोलीस विभागाने उचललेले हे सामाजिक पाऊल अत्यंत कौतुकास्पद असून, अशा उपक्रमांमुळे पोलीस आणि समाजातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
खाकी वर्दीतील माणुसकीचा हा सुंदर चेहरा समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.




