*डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न-खर्चावर संशोधन; निलेश कोहक यांना पीएच.डी.*

*डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न-खर्चावर संशोधन; निलेश कोहक यांना पीएच.डी.*
नेवासा तालुका :
ग्रामीण भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून त्यांच्या उत्पन्न व खर्चाचे विश्लेषण करणारे संशोधन करणारे सलाबतपूर येथील रहिवासी तथा श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ढोरजळगाव येथे अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक निलेश विष्णू कोहक यांनी शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून मानव्यविद्या शाखेअंतर्गत अर्थशास्त्र विषयात त्यांनी पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त केली आहे.
निलेश कोहक यांनी अर्थशास्त्र विषयात नेट व सेट पात्रता परीक्षा यापूर्वीच उत्तीर्ण केली असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित विषयावर त्यांनी पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केले. ग्रामीण भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न व खर्चाचे अध्ययन या विषयावर त्यांनी सखोल अभ्यास करून डाळिंब शेतीतील आर्थिक वास्तव, उत्पादन खर्च, उत्पन्नाचे स्रोत आणि शेतकऱ्यांसमोरील विविध आर्थिक आव्हाने यांचा अभ्यास केला. त्यांच्या या संशोधनाचा ग्रामीण भागातील शेतकरी आणि कृषी अर्थव्यवस्थेच्या अभ्यासासाठी उपयोग होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अध्यापनासोबतच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर शैक्षणिक पातळीवर संशोधन करण्याच्या त्यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल निलेश विष्णू कोहक यांचे नेवासा तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे सलाबतपूर परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रातही मानाचा तुरा खोवला गेला आहे.




