Breaking
ई-पेपर

पंढरपुरात चौथी राष्ट्रीय केळी परिषद; केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर होणार मंथन

0 9 5 0 2 3

पंढरपुरात चौथी राष्ट्रीय केळी परिषद; केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर होणार मंथन

अहिल्यानगर :

केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोरील वाढत्या अडचणी, नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठ, हमीभाव, पीकविमा, निर्यात, प्रक्रिया उद्योग तसेच केळी संशोधनाला चालना देण्याच्या विविध मागण्यांवर व्यापक चर्चा करण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बनाना महासंघ यांच्या वतीने चौथी राष्ट्रीय केळी परिषद रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आनंदी विनायक मंगल कार्यालय, वाखरी रोड, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती गंभीर असून केळी पिकासमोरील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अतितापमान, वादळी वारे, गारपीट, अतिवृष्टी आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांचा मोठा फटका उत्पादकांना सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर पीकविमा, बाजारपेठेतील चढ-उतार, हमीभाव, निर्यात व्यवस्था आणि प्रक्रिया उद्योगाच्या मर्यादा यामुळे केळी उत्पादकांसमोर आर्थिक आव्हाने निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर केळी शेतीतील तज्ज्ञ, विचारवंत, संशोधक, उद्योजक आणि शेतकरी यांनी एकत्र येऊन समस्यांची कारणमीमांसा करून ठोस उपाययोजना सुचविणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

परिषदेत केळीला हमीभाव मिळावा, केळी पिकाचा भाऊसाहेब फुंडकर योजनेत समावेश करावा, केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करावा, एफपीओंना थेट मदत द्यावी, प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन द्यावे, अतिवृष्टी व दुष्काळग्रस्त केळी उत्पादकांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, देशांतर्गत तसेच निर्यात बाजारपेठ वाढवावी, केळी संशोधन केंद्राची स्थापना करून संशोधनाला चालना द्यावी तसेच केळी उत्पादकांसाठी स्वतंत्र शासकीय महामंडळ स्थापन करावे, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण मार्गदर्शन करणार असून उद्घाटक म्हणून अखिल भारतीय बनाना महासंघाचे मध्यप्रदेश राज्य अध्यक्ष हेमंत पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच अॅग्री सर्च इंडिया प्रा. लि.चे केळी तज्ज्ञ शरद विस्पुते हे ‘जमिनीचे आरोग्य व अन्नद्रव्य व्यवस्थापन’, केळी रोग व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. प्रकाश सावंत (अॅग्रोमनिस्ट, डीसीएम श्रीराम), सचिन वाघमोडे (मार्केटिंग डायरेक्टर, जैविकॉन) यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून फ्रुट केअर, निर्यात व्यवस्थापन, केळी रोप लागवड व व्यवस्थापन यासह केळी उत्पादनाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळावे आणि शेतीसमोरील समस्यांवर तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यवहार्य उपाययोजना पुढे याव्यात, या उद्देशाने या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पंढरपूर येथे उपस्थित राहून परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण यांनी केले आहे. तसेच अखिल भारतीय बनाना महासंघ महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक पुरुषोत्तम धोंडीराम सर्जे यांनीही केळी उत्पादकांनी पंढरपूर येथे परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

पत्रकार परिषदेस अतुलनाना माने पाटील, डॉ. हनुमंत चिकणे, किशोर चौधरी, उत्तम पाटील, राजेश नवाल, पंढरीनाथ इंगळे, सचिन कोरडे, महेंद्र पाटील, वैभव पोळ, पुरुषोत्तम सर्जे, धिरज पाटील, ओंकार पवार, नितीन चव्हाण, सागर रणदिवे, राहुल जाधव, रत्नाकर पाटील आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे