Breaking
ई-पेपरराजकिय

*जिल्हा बँकेच्या निवडणुकीत *नेवासा मतदारसंघातून रत्नमाला लंघे मैदानात*

*शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज घेतला; आमदार विठ्ठलराव लंघेंसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती*

0 9 5 0 2 3

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेवासा मतदारसंघातून रत्नमाला लंघे मैदानात

शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज घेतला; आमदार विठ्ठलराव लंघेंसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

अहिल्यानगर प्रतिनिधी -महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेकडून सौ. रत्नमाला ताई विठ्ठलराव लंघे यांनी आज उमेदवारी अर्ज घेतला. यावेळी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पा., भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा तसेच शिवसेना-भाजप महायुतीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २८ सप्टेंबरपासून सुरू झाली असून ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. या निवडणुकीत २१ संचालक पदांसाठी निवडणूक होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतदान, तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासोबतच राजकीय वर्तुळातही या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

नेवासा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक विशेष चर्चेत आली आहे. प्रारूप मतदारयादीच्या प्रक्रियेतच आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पत्नी रत्नमाला लंघे यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले होते. त्यामुळे आज शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज घेण्यात आल्याने त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेवासा विधानसभा मतदारसंघात आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची राजकीय ताकद असताना आता सहकार क्षेत्रातील या महत्त्वाच्या निवडणुकीत रत्नमाला लंघे यांची उमेदवारी पुढे आली आहे. जिल्हा बँक ही शेतकरी, सेवा सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी थेट जोडलेली महत्त्वाची वित्तीय संस्था असल्याने संचालक मंडळाची निवडणूक केवळ राजकीय समीकरणांपुरती मर्यादित न राहता सहकार क्षेत्राच्या भविष्यातील धोरणांवरही परिणाम करणारी मानली जात आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चाही जिल्ह्यात सुरू आहेत. काही नेत्यांनी दुष्काळी परिस्थिती आणि निवडणूक खर्चाचा विचार करून सहमतीने निवडणूक करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने विविध मतदारसंघांत इच्छुकांच्या हालचाली वाढल्या असून अंतिम चित्र अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.

नेवासा मतदारसंघातून रत्नमाला लंघे यांनी घेतलेल्या उमेदवारी अर्जामुळे आता मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित असल्याने या उमेदवारीला महायुतीच्या स्थानिक राजकारणाच्या संदर्भातही महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी काळात अन्य इच्छुकांची भूमिका काय राहते, विरोधक कोणती रणनीती आखतात आणि अंतिम उमेदवारीचे चित्र कसे आकार घेते, यावर नेवासा मतदारसंघातील जिल्हा बँक निवडणुकीची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे