*पावसाविना बैलपोळा; शेतकऱ्यांच्या आनंदावर दुष्काळाचे सावट*
*तीन महिने उलटले तरी पावसाची प्रतीक्षा; सोयाबीन, बाजरी, मका, कपाशी, तुरीची पिके संकटात*

पावसाविना बैलपोळा; शेतकऱ्यांच्या आनंदावर दुष्काळाचे सावट
तीन महिने उलटले तरी पावसाची प्रतीक्षा; सोयाबीन, बाजरी, मका, कपाशी, तुरीची पिके संकटात
अहिल्यानगर : शेतकऱ्यांच्या जीवनाशी अतूट नाते असलेला आणि शेतकऱ्याचा जिवाभावाचा सोबती मानला जाणारा बैल याच्या पूजनाचा बैलपोळा सण उद्या साजरा होत आहे. मात्र यंदा या सणावर पावसाअभावी दुष्काळाचे गडद सावट पसरले असून, शेतकरी राजाच्या आनंदावर चिंतेची छाया दिसून येत आहे.
पूर्वी बैलपोळा म्हटले की पावसाच्या सरी, हिरवीगार शेतशिवारं, बैलांची सजावट आणि उत्साहाचे वातावरण असे चित्र पाहायला मिळायचे. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तीन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाचे कोणतेही ठोस संकेत दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.
विशेष म्हणजे, आधुनिक शेतीच्या युगात शेतकऱ्याचा पारंपरिक साथीदार असलेला बैलही आता दुर्मिळ होत चालला आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यात बैलजोडी असायची; मात्र यांत्रिकीकरणामुळे बैलजोड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, आता तुरळक शेतकऱ्यांकडेच बैलजोड्या पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत उपलब्ध असलेल्या बैलजोडींची पूजा करून पोळा साजरा करण्याची परंपरा मात्र शेतकरी आजही जपत आहे.
पिके पावसाच्या प्रतीक्षेत
शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केलेली सोयाबीन, बाजरी, मका, कपाशी आणि तूर यांसारखी पिके सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक भागांतील पिकांना पाण्याची नितांत गरज असून, पाऊस लांबल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. वेळेत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांच्या हाती आलेली उभी पिके डोळ्यादेखत वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
पोटाची खळगी भरण्यापेक्षा जमिनीची भूक भागविण्याला प्राधान्य देत शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेली जमापुंजी, उधारी आणि कर्जाचा पैसा शेतीत ओतला. मात्र पावसाने दडी मारल्याने केलेला खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्पन्न नाही, खर्च वाढला आणि कर्जाचा डोंगर मात्र कायम अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
कर्जाच्या ओझ्यासोबत दुष्काळाचे संकट
एका बाजूला पावसाचा लहरीपणा आणि दुसऱ्या बाजूला वाढते शेतीचे खर्च व कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. कर्जमाफीच्या आश्वासनांबाबतही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आता केवळ कर्जमाफीची चर्चा न करता, पावसाने अशीच दडी मारली तर शासनाने तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दुष्काळसदृश उपाययोजना आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यंदाचा बैलपोळा शेतकऱ्यांसाठी केवळ बैलपूजनाचा सण राहिलेला नाही, तर आभाळाकडे आशेने पाहणाऱ्या बळीराजाच्या वेदनेचे प्रतिबिंब बनला आहे. बैलांच्या अंगावर सजावटीचा साज चढेल; मात्र शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे सावट दूर करण्यासाठी आता वरुणराजाच्या कृपावृष्टीचीच प्रतीक्षा आहे.




