*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणे हीच खरी आदरांजली : आमदार विठ्ठलराव लंघे*

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणे हीच खरी आदरांजली : आमदार विठ्ठलराव लंघे*
नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लहूजी सेना (वडुले)ता. नेवासा यांच्या वतीने येथील लक्ष्मीमाता सभामंडपात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त तसेच थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार लंघे म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि क्रांतिकारी विचारांच्या माध्यमातून शोषित, वंचित व कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. समता, सामाजिक न्याय आणि मानवी स्वाभिमानाचा त्यांनी दिलेला संदेश आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी राष्ट्रभक्ती, स्वराज्य आणि जनजागृतीची ज्योत प्रज्वलित करून स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. या दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपणे आणि तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य व विचारांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांनीही उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी महाराष्ट्र लहूजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ भारस्कर, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गुणवंत विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




