कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने व ‘आत्मा’ अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम संपन्न
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने व ‘आत्मा’ अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम संपन्न
दहिगाव-ने (प्रतिनिधी):- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने व ‘आत्मा’ अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित शेतक-यांना खरीप कांदा, केळी, ऊस, सोयाबीन, तुर, कपाशी, उडीद व शासनाच्या विविध योजना याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
या शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमास ‘आत्मा’ अहमदनगर चे प्रकल्प उपसंचालक श्री. राजाराम गायकवाड, यांनी ‘आत्मा’, स्मार्ट प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन व कृषि विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणा-या विविध योजनाबद्दल उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. योजनांचा लाभ घेण्यासाठी गट पद्धतीने व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतक-यांनी एकत्र येवून गटाची व शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करावी असे आवाहन केले. केव्हीके दहिगाव-ने राबविले जाणारे विविध कार्यक्रम मा.आ.डॉ. नरेंद्रजी घुले पाटील व मा.आ.श्री. चंद्रशेखर घुले पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहेत. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. कौशिक यांनी सद्यस्थितीमध्ये खरीप हंगामातील प्रमुख पिके जसे तुर, उडीद, सोयाबीन, कपाशी या पिकांमध्ये वापरावयाच्या विविध तंत्रज्ञानाबद्दल उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. श्री. नंदकिशोर दहातोंडे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) यांनी खरीप कांदा, केळी, लिंबू व नवीन फळबाग लागवड याबद्दल शेतक-यांना मार्गदर्शन करून त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी पंचायत समिती नेवासा चे गटविकास अधिकारी श्री. लखवाल, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. कासार हे देखील उपस्थित होते. त्यांनी पंचायत समितीच्या माध्यामतून शेतक-यांसाठी राबविल्या जाणा-या योजनामधील माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतक-यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रास भेट दिली व त्यांना केव्हीके प्रक्षेत्रावर सुरु असलेल्या विविध प्रकल्प व पिकांबद्दल माहिती देण्यात आली. कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्राचे इंजी. राहुल पाटील, श्री. माणिक लाखे, श्री. नारायण निबे, डॉ. चंद्रशेखर गवळी, श्री. प्रकाश बहिरट, ‘आत्मा’ शेवगाव चे श्री. निलेश भागवत हे उपस्थित होते. श्री. सचिन बडधे, विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार) यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.