
सौ.हर्षदा काकडे यांच्या समर्थनार्थ वज्र निर्धार मेळाव्याचे आयोजन – देविदास गिर्हे.
शेवगाव प्रतिनिधी : (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेचा सौ.हर्षदा काकडे यांच्या समर्थनार्थ वज्र निर्धार मेळावा दि. ०५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०९.३० वा शेवगाव येथील खंडोबा मैदान येथे आयोजित केला असल्याची माहिती जनशक्ती विकास आघाडीचे युवा नेते देविदास गिर्हे यांनी प्रतिनिधींशी बोलतांना दिली.
शेवगाव – पाथर्डी विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी म्हणून या वज्र निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यामध्ये प्रसिद्ध विनोदी अभिनेते तथा नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे व आय.बी.एन.लोकमतचे वृत्तनिवेदक विलास बडे, अॅड.शिवाजी काकडे, मा.जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
यावेळी पुढे बोलताना गिर्हे म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीवेळी काकडे कुटुंबाला पक्षांनी डावलेले आहे. दहा वर्षांपूर्वी तर मिळालेले पक्षाचे तिकीट विद्यमान लोकप्रतिनिधींनी पैशाच्या जोरावर अचानक दुसऱ्या पक्षातुन येऊन पळवून नेले. ज्या काकडे दाम्पत्यांनी २५ वर्षापासून पक्ष मोठा केला, पक्षासाठी अनेक आंदोलने, मोर्चे, काढून पक्ष तळागाळात वाढवला त्यांचा पत्ता अचानक कट करून दुसऱ्या पक्षातील आयात उमेदवाराला तिकीट दिले. म्हणून आमचा त्या दिवसापासून पक्षावरचा विश्वास उडालेला आहे. आज सर्वच पक्षात आयात निर्यात परिस्थिती सुरु आहे. कुणीच कुणाचे ठाम राहिलेले नाही. हे सर्व चित्र लोकशाहीच्या दृष्टीने पूर्णपणे घातक आहे. या मतदारसंघातील सत्ता आलटून पालटून फक्त साखर सम्राटच भोगत आहेत. त्यांनी जनतेचा विश्वास नाही तर स्वतःचा विकास साधून घेतलेला आहे. जनतेचे प्रश्न आजही जशास तसेच आहेत. मतदारसंघातील सुज्ञ जनता आता हे ओळखून आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची उमेदवारी काकडे यांनी करावी म्हणून दि.०५ सप्टेंबर रोजी खंडोबा नगर येथे प्रस्थापित साखर सम्राटांना त्यांची जागा येत्या विधानसभेमध्ये दाखवण्यासाठी या वज्र निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे या मेळाव्याला दोन्ही तालुक्यातील सर्व सामान्य जनतेने मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी गिर्हे यांनी केले आहे.